Satara,Maharashtra,India
शिक्षक दांपत्याची शेतीत कमाल, एक एकरात १३५ टन उसाचे उत्पादन
पुणे, पारगाव : पारगाव ता. आंबेगाव येथील शेतकरी संतोष सखाराम लबडे व त्यांच्या पत्नी सरस्वती लबडे यांच्या शेतातील ऊस तोडणी सुरु असून त्यांच्या शेतातील एकेका ऊसाला ५५ ते ६० कांडे आहेत. त्यांनी एक एकर क्षेत्रातील आडसाली ऊसापासून एकूण १३५ टन ऊस उत्पादन घेण्याची किमया साधली असून त्यांच्या शेतातील ऊस पाहण्यासाठी परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी गर्दी करत आहे.
संतोष लबडे हे पारगाव जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक आहेत तर त्यांच्या पत्नी सरस्वती लबडे या अवसरी बुद्रुक जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका आहेत. शाळेत अध्यापनाचे काम करत घरची शेती सुद्धा उत्तम प्रकारे करत आहे. त्यांनी पारगाव येथील श्री जय हायटेक नर्सरी मधुन २६५ जातीच्या ऊसाची तयार रोपे घेऊन दि.१ जुन २०२५ रोजी एक एकर क्षेत्रात ऊसाची लागवड केली होती.
ऊस लागवडी अगोदर अंतर मशागत घेऊन एकरी आठ ट्रॉली शेणखत व बेसल डोस यांचा वापर केला नंतर रोपांची लागवड केली भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे ऊस विकास अधिकारी सोमेश्वर दीक्षित, दिनकर आदक, मुख्य शेतकी अधिकारी दिलीप कुरकुटे, संतोष थोरात, सचिन सैद यांच्या मार्गदर्शनाखाली ऊसाला वेळोवेळी खते, पाणी यांचा वापर केला पाण्यासाठी ठिबक सिंचनाचा वापर केला.
सदर पिक घेताना राजलक्ष्मी अग्रो चे संतोष कुल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली औषधांचे योग्य प्रमाण , खते औषधांचे नियोजन , पाणी व्यवस्थापन यामुळे एकरी सव्वाशे टनाहून अधिक उत्पादन घेऊ शकलो असे संतोष लबडे यांनी सांगितले.
परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी भागचंद पोंदे, कांताराम दातखिळे व दिलीप लोखंडे यांनी संतोष लबडे यांच्या शेतावर भेट देऊन चांगल्या प्रकारे ऊस उत्पादन घेतल्याबद्दल कौतुक केले आहे. भीमाशंकर साखर कारखान्याने ऊस तोडणी केली असून एक एकरातून एकूण १३४.८२ टन ऊस उत्पादन निघाले आहे.
0 कमेंट
कमेंट करा
तुमचा ईमेल आयडी दाखवला जाणार नाही . * केलेले आवश्यक आहे.