Buldhana,Maharashtra,India
जि.प. शिक्षिकेचा शाळेत जाताना अपघाती मृत्यू
होळी दिवशी वृषाली गावंडे यांचा अपघात

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. आपल्या कर्तव्यावर शाळेत जात असलेल्या जिल्हा परिषदेच्या एका तरुण शिक्षिकेचा भीषण रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे.
होळीच्या दिवशी घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
जळगाव जामोद तालुक्यात एक भीषण अपघात घडला असून, यामध्ये एका कर्तव्यदक्ष शिक्षिकेला आपला जीव गमवावा लागला आहे. पातुर्डा बुद्रुक येथील रहिवासी असलेल्या वृषाली प्रकाश गावंडे (वय 35) या जिल्हा परिषद शाळेवर शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या.
टेम्पोची जोरदार धडक
मिळालेल्या माहितीनुसार, वृषाली गावंडे या 2 मार्च रोजी सकाळी आपल्या स्कुटीने पिंपळगाव काळे येथील शाळेवर जात होत्या. कवठळ- भेंडवळ रोडवर पाठीमागून येणाऱ्या एका दूध संकलन केंद्राच्या 'सेंट्रो' गाडीने त्यांच्या स्कुटीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, वृषाली गावंडे खाली पडल्यानंतर गाडीचे चाक त्यांच्या डोक्यावरून गेले. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर घाबरलेला चालक गाडीसह घटनास्थळावरून पसार झाला.
पोलीस तपास आणि कारवाई
घटनेची माहिती मिळताच जळगाव जामोदचे पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय स्नेहा शेंडगे, पोलीस हवालदार मानकर आणि मस्के यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जळगाव जामोद येथील रुग्णालयात पाठवला. फरार चालकाचा आणि संबंधित वाहनाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विविध पथके रवाना केली आहेत.
वृषाली गावंडे या अत्यंत मनमिळावू आणि कर्तव्यदक्ष शिक्षिका म्हणून ओळखल्या जात होत्या. त्यांच्या अशा अचानक जाण्यामुळे पातुर्डा गावासह शैक्षणिक वर्तुळात मोठी शोककळा पसरली आहे.
0 कमेंट
कमेंट करा
तुमचा ईमेल आयडी दाखवला जाणार नाही . * केलेले आवश्यक आहे.